Government of India

रासनिप्रा बद्दल

प्राधिकरणाबाबत थोडक्यात आढावा :-

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे गठण :

भारतीय राज्य घटनेतील संविधान कायदा 2011 (97 वी घटनादुरुस्ती) मधील अनुच्छेद 243 झेड के, अन्वये राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूकांमध्ये मतदार याद्यांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करणे व अशा सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका पार पाडण्याची जबाबदारी राज्य विधिमंडळाच्या कायद्यान्वये स्थापित राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे.

त्यानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करण्यात येऊन, राज्यात ‘राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणा’ चे गठण करण्यात आले. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 (1961 चा महा.24), चे कलम 73 कब अन्वये, राज्य सरकारने सहकार निवडणूक आयुक्त चा सामवेश असलेल्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची स्थापना करणे अभिप्रेत आहे. त्यानुसार शासन राजपत्र अधिसुचना क्र. सीएसएल-2013/प्र.क्र.124/15- स,दिनांक 30/03/2013 अन्वये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे (रासनिप्रा) गठन करण्यात आले. राज्य शासनाने बनविलेले कायदे आणि नियमानुसार राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका, पार पाडणे व मतदार याद्या यांचे अधिक्षण, निर्देशन आणि नियंत्रण करण्याची जबाबदारी स्वतंत्र व स्वायत्त संस्था असलेल्या राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची आहे. मा.मुंबई उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. 12321/2015 सोबत 11049/2015 मध्ये राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण ही एक स्वायत्त, स्वतंत्र आणि नि:पक्षपाती प्राधिकरण असल्याचे स्पष्ट केले आहे.

ज्या सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांची सभासद संख्या 250 किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा संस्थांच्या निवडणूका त्या संस्थांनीच घ्यावयाच्या आहेत. त्यामुळे, अशा संस्थांच्या निवडणूका राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडुन घेतल्या जात नाहीत.

शासन राजपत्र अधिसुचना क्र.केपीएम.0817/प्र.क्र.164/21-स (2), दिनांक 18.12.2017 अन्वये राज्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका घेण्याचे अधिकार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महराष्ट्र राज्य, पुणे यांना प्रदान केले आहेत.

निवडणुका पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून, निवडणूक नियमात नमुद केल्याप्रमाणे सहकारी संस्थांचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, आणि ‘ड’ असे वर्गीकरण करण्यात आले आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे (रासनिप्रा) कार्यालय पुणे येथे आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी आणि तालुका / प्रभाग सहकारी निवडणूक अधिकारी यांची संबंधिंत क्षेत्रातील निवडणूकां घेण्याकरीता नियुक्ती केली आहे.